उत्तरापथ

तक्षशिला से मगध तक यात्रा एक संकल्प की . . .

तंत्रनिकेतन नव्हे तंत्रशिक्षणाचा सर्वंकष विचार


Questionmarkगेल्या काही दिवसांपासून अभियांत्रिकी शिक्षणाबद्दल काही वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानावर तरुण भारतात श्रीधर हरकरे यांनी ‘डिप्लोमा इंजिनीयरिंगचा दुरुपयोग’ शीर्षकाने प्रकाशित झालेले पत्र. पदविकाधारकांनी अभियांत्रिकी पदवी (बी. ई.) च्या द्वितीय वर्षात प्रवेश घेण्याला अपराधी स्वरूपात व्यक्त केले आहे. तीन वर्षे तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मध्ये पदविका शिक्षण घेतल्यानंतर पदवी पाठ्यक्रमात सरळ द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो. शिक्षण मंत्र्यांच्या मते गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे प्रवेश घेण्यार्‍यांची संख्या वाढली आहे व ही परंपरा एकूणच तंत्र शिक्षणाकरिता अनुचित असल्याचा सूर या विधानात आहे. श्रीधर हरकरे तर याला पदविका अभ्यासक्रमाचा दुरुपयोग, असे नाव देतात. या निमित्ताने तंत्रशिक्षणाच्या एकूण व्यवस्थेचा सर्वांगीण विचार करण्याकरिता हा लेखनप्रपंच.

सध्या भारतामध्ये तंत्रशिक्षणाचे तीन स्पष्ट स्तर आहेत. प्रारंभिक पायरीवर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) द्वारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. कारखान्यातील कुशल श्रमिक तयार करणे हा सीमित उद्देश या स्तरावर आहे. दुसर्‍या स्तरावर तंत्रनिकेतनातील पदविका अभ्यासक्रमाचा उद्देश पर्यवेक्षण करण्यात तरबेज अशा श्रमिक नेतृत्वाचा पुरवठा उद्योगांना करणे हा आहे. कुशल व अकुशल श्रमिकांकडून व्यवस्थित, परिणामकारी कार्य करून घेण्याची जबाबदारी असलेला गटप्रमुख (फोरमन) किंवा पर्यवेक्षक (सुपरवायझर) तयार करणे हे तंत्र निकेतनचे उद्दिष्ट मानले जाते. पूर्वीच्या काळात पदविका प्राप्त तंत्रज्ञांना लक्ष देणार्‍यास ओव्हरसीयर म्हटले जायचे. आजकाल त्याचे नाव कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर) करण्यात आले आहे.

तंत्रशिक्षणाच्या तिसर्‍या स्तरावर अभियांत्रिकीचे पदवी अभ्यासक्रम बी. ई, बी. टेक, बी. आर्किटेक्चर असे पाठ्यक्रम सध्या चालू आहेत. या स्तरावर अभियांत्रिकीचे सैद्धांतिक ज्ञान दिले जाते. प्रात्यक्षिक पण व्हावे अशी अपेक्षा आहे. परंतु सध्या व्यवहार ज्ञानापेक्षा सैद्धांतिक माहितीवर अधिक भर दिला जातो, असे आढळून येते. जेव्हा की वरिष्ठ अभियंत्यापासून मुख्य अभियन्त्यांपर्यंत सर्वांना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक नियोजन, क्रियान्वयन तसेच समस्या समाधान करावे लागते. यासाठी आवश्यक व्यवहारज्ञान पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षणात मिळत नसून, काम करता करता अनुभवातून शिकावे लागत आहे. अभियांत्रिकी पदवीधारकाच्या योग्यतेबाबत अनेक सर्वेक्षणे वेळोवेळी केली जातात. त्यात आढळून आले की केवळ १७ ते २० टक्के विद्यार्थीच अभियंता बनण्याजोगे असतात. नव्वदच्या दशकानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयाची संख्या कित्येक पटींनी वाढली, पण गुणवत्तेत सुधार झाला नाही.

भारतीय शिक्षण मंडळातर्फे ‘तंत्रशिक्षणाचे भारतीय प्रारूप’ या विषयावर देशात अनेक ठिकाणी मुक्त चर्चा घेण्यात आल्या. अनुभवी प्राध्यापक, प्राचार्य या चर्चेमध्ये सामील झाले. चर्चेत तंत्रशिक्षणाचे व्यावहारिक समीक्षण आपोआपच झाले. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आला की, शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही प्रत्यक्ष कार्यानुभव असणे चांगले अभियंते बनण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तंत्रशिक्षकांनी सुट्यांमध्ये प्रत्यक्ष उद्योगात कार्यानुभव घ्यावा अशाही सूचना समोर आल्या. शिक्षकांनी आपल्या अनुभवाने एक महत्त्वाची बाब सांगितली- पदविका अभ्यासक्रम करून नंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना संकल्पना जास्त चांगल्या स्पष्ट होतात व ते जास्त चांगले अभियंते सिद्ध होतात. या निष्कर्षाबद्दल सविस्तर चर्चा केल्यावर लक्षात आले की, तंत्रनिकेतनात व्यावहारिक प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना अधिक मिळते. त्यामुळे त्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचे सिद्धांत सहज उलगडतात. सरळ पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणारे विद्यार्थी बारावपिर्यंतच विज्ञानाचा अभ्यास करत असतात व तंत्रज्ञानाची ओळख त्यांना महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातच होते. त्याउलट दहावीनंतर तंत्रनिकेतनात शिकलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षाचा तंत्रज्ञानाचा अनुभव मिळालेला असतो. एक वर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी व सरळ द्वितीय वर्षात प्रवेश घेणारा विद्यार्थी याची तुलना केल्यास पदविका प्राप्त केलेला विद्यार्थीच सरस ठरतो.

प्रवेश परीक्षांची झालेली अधोगती सर्वांनाच ठावूक आहे. महाराष्ट्रासहित अनेक राज्यांनी प्रवेश परीक्षा रद्द केल्या आहेत व केन्द्रीय प्रवेश परीक्षेच्या गुणांवर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश देणे प्रारंभ केले आहे. यामागील पृष्ठभूमी अशी की, गेल्या वर्षात प्रत्येक राज्यांमध्ये हजारोच्या संख्येमध्ये जागा रिकाम्या राहिल्या. प्रवेश परीक्षा (पी.ई.टी) मध्ये शून्य गुण असणार्‍यांना देखील प्रवेश मिळू लागला. अशा परिस्थितीत बारावी व प्रवेश परीक्षा या मार्गाऐवजी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून द्वितीय वर्षात प्रवेश घेणे याला सोपा मार्ग अथवा शॉर्टकट म्हणणे बरोबर वाटत नाही. उलट हा अधिक सुज्ञपणाचा मार्ग आढळतो. व्यक्तिगत स्तरावर आवश्यकता असल्यास तीन वर्षाच्या पदविकेनंतर पर्यवेक्षक व सदृश नोकरी किंवा छोटा-मोठा स्वरोजगार काढण्याचा पर्याय मोकळा असतो. परिवाराची ऐपत असेल तर पुढे पदवीचा अभ्यास घेण्याचा मार्ग देखील खुला असतो. देश व समाजाच्या दृष्टीने देखील पदविका अभ्यासक्रमात प्राप्त व्यवहारज्ञानाने संपन्न अभियंता अधिक कुशल व परिणामकारी असतो. शिक्षण व्यवस्थेत अशा प्रकारची लवचीकता कुठल्याही राष्ट्राला अधिक उपयोगी असते. म्हणून तंत्र शिक्षणाबद्दल पुनर्विचार करायचा झाल्यास केवळ पदविका अभ्यासक्रमाच्या उपयुक्ततेचा विचार न करता सर्व स्तरावरील तंत्रशिक्षणाच्या गुणवत्तेचा सर्वंकष विचार करावा लागेल.

Ruprekhaभारतीय शिक्षण मंडळाने चार हजाराहून अधिक शिक्षणतज्ज्ञांच्या विचारांना संपादित करून शिक्षणाचे समग्र व एकाग्र धोरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘भारतीय शिक्षण रूपरेखा’ ही पुस्तिका इंग्रजीसहित सर्व भारतीय भाषांमधे प्रकाशित केली आहे. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये या रूपरेषेवर चर्चासत्रे आयोजित होत आहेत. आठवीपर्यंत सोपे सामान्य शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकानेच कुठल्या ना कुठल्या कौशल्याचे प्रावीण्य प्राप्त करावे अशी अपेक्षा आहे. आठवी नंतर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घ्यावा. आठवी झालेले काही विद्यार्थी प्रत्यक्ष कामातही लागू शकतील. आयटीआय केल्यानंतरही स्वरोजगार किंवा नोकरीचे मार्ग सुलभ होतील. प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणात आवड असल्यास त्यांना सेतू अभ्यासक्रमाद्वारे औद्योगिक शिक्षण संस्थेत किवा तंत्रनिकेतनात प्रवेश द्यावा. आयटीआय केलेल्यांपैकी काही जणांस तंत्रनिकेतनात प्रवेश घेण्यासाठी प्रेरित केले जावे. तसेच तंत्रनिकेतनातील बहुतांश विद्यार्थ्यांना पुढे अभियांत्रिकीचा मार्ग मोकळा असावा. दुसरीकडे आठवी नंतर नववी ते बारावीचे उच्च विद्यालयीन शिक्षण हा पर्याय निवडणार्‍यांना देखील या स्तरावर कमीतकमी एक औद्योगिक कौशल्य शिकणे अनिवार्य असावे, असा प्रस्ताव भारतीय शिक्षण रूपरेषेत करण्यात आला आहे. हे तांत्रिक कौशल्य पुढे व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेशाचा भक्कम पाया ठेवेल. ज्याला पुढे विद्युत अभियंता व्हायचे असेल, त्यांनी नववी ते बारावी मध्ये विद्युत गृहकार्य कौशल्य म्हणून घ्यावे. ज्याला पुढे चिकित्साशास्त्राचा अभ्यास करून वैद्य (डॉक्टर) बनायचे आहे त्यांनी नववी ते बारावी मध्ये परिचर्या (नर्सिंग) या कौशल्याचा अभ्यास करावा. असे अनेक क्रांतिकारी उपाय रूपरेषेने सुचवले आहेत.

उभरत्या भारताच्या तरुणाईला प्रोत्साहन, दिशा व त्याचबरोबर योग्य कार्य द्यायचे असल्यास तंत्र शिक्षणाचा समावेश शालेय स्तरापासून करणे नितांत आवश्यक आहे. केवळ तंत्रनिकेतनाचाच नव्हे, तर तंत्रशिक्षणाचा सर्वंकष विचार करणे आज आवश्यक आहे.

अप्रैल 16, 2015 Posted by | सामायिक टिपण्णी | 1 टिप्पणी

   

%d bloggers like this: